IndiaCoroanaNewsUpdate : जे होऊ नये ते झालेच , नव्या कोरोनाची लक्षणे असणारे ६ रुग्ण आढळले !!

नव्या कोरोनाच्या बाबतीत भारतात ज्याची भीती व्यक्त केली जात होती ते झालेच असे आता म्हणावे लागत आहे. त्याचे कारण भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण ६ जणांच्या सॅम्पलपैकी ३ बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, २ हैदराबादमधील CCMB मध्ये तर एक पुण्यातील NIV मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत.
COVID-19: Six UK returnees found positive for new UK variant genome pic.twitter.com/yB79DCZpgf
— ANI (@ANI) December 29, 2020
या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये आयसोलेटेड खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला आहे, त्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील सदस्य आणि इतरांचे ट्रेसिंग केले जात आहे शिवाय इतर नमुन्यांवर Genome sequencing सुरू आहे. भारतामध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. INSACOG लॅबमध्ये टेस्टिंग आणि नमुने पाठवणे, आवश्यक नजर ठेवणे, काळजी घेणे यांसारख्या बाबींमध्ये राज्यांना वेळोवेळी सल्ला देण्यात येत आहे. या परिस्थितीत विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
दरम्यान गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोव्हिड-19 संदर्भात योग्य खबरदारी घेण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत लागू केल्या आहेत. नववर्ष आणि हिवाळ्याच्या हंगामात कोरोनाच्या आणखी केसेस वाढू नये याकरता केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर दक्षता पाळण्यास सांगितले आहे. भारतामध्ये गेल्या २४ तासात १६.४ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा गेल्या सहा महिन्यातील सर्वात कमी आकडा आहे. शिवाय २५२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तसंच आजच्या आकडेवारीनुसार सलग चौथ्या दिवशी मृत्यूचा आकडा ३०० पेक्षा कमी आहे तर नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी सलग नवव्या दिवशी २५ हजारांच्या खाली आहे. लेटेस्ट आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये ५० जणांचा मृत्यू झाला आहे.