MaharashtraNewsUpdate : लंडनहून आलेले प्रवासी देखरेखीखाली , पुण्यात संचारबंदीचे रूपांतर जमावबंदीत

इंग्लंड आणि ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी नागपूर, औरंगाबाद आणि कल्याणमधील प्रत्येकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. या तिघांचे नमुने पुण्यातील NIV लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या तिघांवरही उपचार सुरू आहेत. पुण्याच्या लॅबमधून येणाऱ्या रिपोर्टकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे.
इंग्लंड मधून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आलेले नागरीक आल्याची यादी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून कल्याण डोंबिवली महापालिकेला प्राप्त झाली होती. यापैकी २० जणांची आरटीपीसी आर (RTPCR) टेस्ट करण्यात आली. यातील एका नागरिकाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नागरिकाची प्रकृती स्थिर असली तरीही त्याची अधिकची तपासणी करण्यासाठी त्याचा चाचणी अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीसाठी NIV मुंबई येथून NIV पुणे येथे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान मात्र, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे, राज्य सरकारनं महापालिका क्षेत्रात लागू केल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केले आहेत. त्यानुसार पुणे शहरासह जिल्ह्यात आता रात्री संचारबंदी नसेल तर जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान ५ किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र फिरता येणार नाही. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवांना यातून वगळण्यात आलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचेही आदेश…
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर रात्री जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. शुक्रवार २५ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे. पुणे ,पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रात रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात १ पॉझिटिव्ह , प्रकृती स्थिर
दरम्यान डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंडमधून प्रवास करून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य आधिकाऱ्यानं दिली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर अशून, त्याची करोनाच्या विषाणूची स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळती आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे सहायक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.
१३ डिसेंबर रोजी तो व्यक्ती पुण्यात परतला होता. १७ तारखेला त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्या तरुणाला करोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’ची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) ‘जेनेटिक सिक्वेन्सिंग’ चाचणी करण्यात येणार असल्याचेही वावरे म्हणाले. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान युरोप आणि मध्यपूर्व आशियातून राज्यात ५४४ नागरिक आले आहेत. त्यापैकी ३०० प्रवासी पुण्यातील असून, त्यांचा शोध लागला आहे. या सर्वांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वावरे यांनी दिली.