CrimeNewsUpdate : धक्कादायक : सामूहिक बलात्कार पीडितेवर फौजदारानेही बलात्कार केल्याचा पंडितेचा आरोप !!

उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटना काही थांबायला तयार नाहीत . शाहजहांपूर जिल्ह्यात पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या महिलेनं पोलीस उपनिरीक्षकावरच बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या महिलेच्या आरोपात तथ्य आढळून आल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलीस अधिकारी ब्रह्मपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलालाबादची रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेकडून उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबर रोजी मदनपूरकडे निघालेली असताना तिची रिक्षा अचानक बंद पडली. त्यामुळे ती पायीच मदनपूरकडे निघाली होती. यावेळी, पाठीमागून कारमधून आलेल्या चार जणांनी तिला घेरलं आणि बाजूच्याच शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, अशी या महिलेची तक्रार होती.
दरम्यान या महिलेनं केलेल्या दाव्यानुसार, सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी ती जलालाबाद पोलीस स्टेशनला दाखल झाली असता तिथे उपस्थित असणाऱ्या विनोद कुमार या पोलीस अधिकाऱ्यानेही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेने बरेली क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस महासंचालक अविनाश चंद्र यांना भेटून आपली कैफीयत त्यांच्यासमोर मांडली. या कथित बलात्कार प्रकरणानं अविनाश चंद्र यांनाही धक्का बसला. वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालून असल्याचं अविनाश चंद्र यांनी सांगितलं आहे.