IndiaMorningNewsUpdate : आंदोलकांच्या भेटीला नव्हे तर पंतप्रधान गेले गुरुद्वाऱ्यात , गुरु तेगबहादूर यांना केलं नमन

दिल्लीच्या सीमेवर पंजाब – हरयाणाच्या शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनातील शीख आंदोलकांची मोठी संख्या लक्षात घेता आपण आणि शीख समुदाय किती जवळचे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करताना दिसत आहेत. अप्रत्यक्षरित्या प्रारंभी सरकारने आयआरसीटीसी मार्फत शिख नागरिकांना लाखो ईमेल पाठवून शिख समाजाप्रती मोदींचे काय योगदान आहे याची माहिती दिल्याचे वृत्त आले होते. आज तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी अचानक राजधानी दिल्लीस्थित रकाबगंज गुरुद्वाऱ्यात माथा टेकत गुरु तेगबहादूर यांना नमन केलं.
Some more glimpses from Gurudwara Rakab Ganj Sahib. pic.twitter.com/ihCbx57RXD
— Narendra Modi (@narendramodi) December 20, 2020
दिल्लीतील रायसीना हिल्सच्या मागच्या बाजुला स्थित असणाऱ्या या गुरुद्वारामध्ये गेल्या २५ दिवसांपासून ‘शीख समागम’ सुरू आहे. याबाबत वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या गुरुद्वारा रकाबगंज इथल्या दौऱ्यात कोणतीही विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती किंवा ट्राफीक बॅरियर लावण्यात आले नव्हते. पंतप्रधानांच्या या भेटीबद्दल त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. तसंच इंग्रजीसोबतच पंजाबी भाषेतही ट्विट करण्यात आलंय.’जिथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब गुरुद्वारात आज सकाळी मी प्रार्थना केली. मला अत्यंत प्रसन्न वाटलं. मी जगातील कोट्यावधी लोकांप्रमाणेच श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणानं मलाही खूप प्रेरणा दिली आहे’ अशी भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या या भेटीनंतर व्यक्त केली.
Delhi: PM Narendra Modi visited Gurudwara Rakab Ganj Sahib today morning and paid tributes to Guru Teg Bahadur for his supreme sacrifice. pic.twitter.com/JCK3w1gObm
— ANI (@ANI) December 20, 2020
दरम्यान ‘आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजींच्या ४०० व्या प्रकाश पर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत, ही गुरु साहेबांचीच कृपा आहे. चला, हा मंगल प्रसंगी ऐतिहासिक मार्गाने चिन्हांकित करू आणि श्री गुरु तेग बहादूरजी यांचा आदर्श साजरा करू’ असंही म्हणत आपल्या या भेटीचे काही फोटोही पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा आज २५ वा दिवस आहे. करोना संक्रमण काळात तापमानाचा पारा ४ अंशांपर्यंत खाली पोहचलेला असताना शेतकरी या कायदा मागे घेण्याची मागणी करत रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या आंदोलकांत मुख्यत: पंजाब आणि हरयाणातल्या शीख समुदायातील शेतकऱ्यांचा सहभाग सर्वाधिक आहे.