IndiaNewsUpdate : देश : देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदी यांचे आवाहन , कृषी मंत्र्यांचे पत्र वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केंद्राच्या नव्या कृषी विधेयकां विरोधात गेल्या २५ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष करीत देशातील शेतकऱ्यांना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लिहिलेलं पत्र वाचा असे प्रत्येक प्रादेशिक भाषेत आवाहन केले आहे . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपल्या ट्विटरवरील मराठी संदेशात पंतप्रधानांनी , शेतकऱ्यांनी ते पत्र वाचावे असं आग्राहाचं आवाहन केलं आहे. कृषीमंत्र्याचं ते पत्र मराठीत भाषांतरीत करण्यात आलं आहे.
कृषी मंत्री @nstomar जी यांनी शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, विनम्र संवादाचा हा प्रयत्न आहे. सर्व अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र जरूर वाचावे.
— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2020
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत संवाद साधला. या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलकांशी कोणतीही चर्चा न करता आता थेट पंतप्रधानांनी देशातील शेतकऱ्यांनाच सद् घातली आहे .
या ट्विटच्या आधी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी मध्यप्रदेशातल्या शेतकऱ्यांशी बोलताना विरोधी पक्षासहित सगळ्यांना हात जोडून विनंती केली होती. या नव्या बिलांचे विरोधी पक्षांनी श्रेय घ्यावे मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं. कृषिमंत्र्यांनी लिहिलेल्या भावनिक पत्रात त्यांनी सर्व आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण स्वत: शेतकरी असून शेतात काम करण्यापासून ते माल विकण्यापर्यंत सर्व गोष्टींचा अनुभव असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. MSP आणि APMCला कुठलाही धक्का लागणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं. आता या पत्राचं सर्व भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं असून ते पत्र देशभर पोहोचवावं असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.