WorldNewsUpdate : दुनिया : गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केल्याबद्दल अमेरिकेला खेद , आंदोलकांवर कठोर कारवाई

विदेशात खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून खलिस्तानवादी आणि भारत विरोधी घोषणा देत अमेरिकेतील भारतीय दूतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची सहा महिन्यात दोन वेळेस विटंबना करण्यात आली. या घटनेची व्हाइट हाउसनेदेखील दखल घेतली असल्याचे वृत्त आहे. कथित खलिस्तानवाद्यांनी भारतीय दूतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना खेदजनक असून या आंदोलकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल आहे. वास्तविक गांधीजींच्या प्रतिष्ठेचा विशेषत: अमेरिकेच्या राजधानीत आदर केला पाहिजे, असे व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅली मॅकनॅनी यांनी नमूद केले.
विदेशी संस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतात नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिख-अमेरिकी तरुणांनी शनिवारी निदर्शने केली होती. यादरम्यान हिंसक खालिस्तानी फुटीरतावाद्यांच्या एका गटाने वॉशिंग्टनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची मोडतोड केली. याबाबत पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मॅकनॅनी म्हणाल्या, ‘हे भयंकर आहे. कोणत्याही पुतळ्याची किंवा स्मारकाची मोडतोड होऊ नये. शांतता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांसाठी लढलेल्या गांधीजींसारख्या व्यक्तींच्या पुतळ्याबाबत तर निश्चितच नाही. हे अनेकदा घडले असून खेदजनक आहे.’ तर अमेरिकेत विदेशी दूतावासांना सुरक्षा देण्याची जबाबदारी आम्ही अत्यंत गंभीरतेने घेतो आणि भारतीय दूतावासासोबत नुकत्याच घडलेल्या घटनेवर चर्चा सुरू आहे, असे विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
दरम्यान ग्रेटर वॉशिंग्टन डीसी, मेरीलँड आणि व्हर्जिनया वगळता न्यूयॉर्क, न्यूजर्सी, पेनसिल्व्हानिया, इंडियाना, ओहियो आणि नॉर्थ कॅरोलिना आदी राज्यांतून आलेल्या शेकडो शीख नागरिकांनी वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासापर्यंत कार रॅली काढली होती. त्याचदरम्यान भारतविरोधी पोस्टर आणि खालिस्तानी झेंडे घेतलेले काही शीख तेथे पोहोचले. त्यापैकी काही खलिस्तान समर्थक शीख हाती कृपाण घेऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आले. त्या पुतळ्यावर त्यांनी एक पोस्टर चिकटवले. त्याच वेळी भारतविरोधी आणि खालिस्तान समर्थनाच्या घोषणाही दिल्या. शांतता आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या पुतळ्याचे विद्रुपीकरण केल्याबद्दल भारतीय दूतावासाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. दूतावासाने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणी अमेरिकी न्याय व्यवस्थेसमोर तीव्र नाराजी व्यक्त करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. शनिवारी दुपारी जेव्हा ही घटना घडली तेव्हा वॉशिंग्टन डीसी पोलिस आणि गुप्तचर विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.