MaharashtraCoronaUpdate : राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान, ७० रुग्णांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज ७० जणांनी करोना संसर्गामुळं आपले प्राण गमावले आहेत. राज्यातील करोना मृतांचा आकडा आता ४८ हजार ३३९ इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १८ लाख ०६ हजार ८०८ चाचण्यांपैकी १८ लाख ८६ हजार ८०७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५ लाख २४ हजार ०५९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार ३१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज 3442 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4395 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1766010 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 71356 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.60% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 15, 2020
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून करोनाचा आकडा झपाट्याने खाली येत आहे. त्याचबरोबर, अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाणही आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून महाराष्ट्र करोनाच्या विळख्यात सापडला आहे. आरोग्य प्रशासन, पोलिस यंत्रणा, प्रशासनाने करोना रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली होती. प्रशासनाच्या याच प्रयत्नांना आता अखेर यश येताना दिसत आहे. आज ही करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का वाढला आहे.
आज राज्यात ४ हजार ३९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १७ लाख ६६ हजार ०१० बाधित रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३. ६० इतका झाला आहे. तर, राज्यात सध्या ७१ हजार ३५६ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.