IndiaNewsUpdate : राज्यातील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याची केरळच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

केरळ सरकारने राज्यात नागरिकाना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी ही घोषणा केली. यापूर्वी बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचं आश्वासन दिल आहे. राज्यातील नागरिकांना करोनावरील लस मोफत देण्यात येईल. लसचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलेल. आम्ही केंद्र सरकारच्या आदेशाची वाट पाहत असून केंद्राने हिरवा कंदिल दाखवताच सर्व प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल, असं पिनराई विजयन यांनी सांगितलं.
दरम्यान राज्यातील करोनाची लागण होणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असून राज्यातील करोनाचा मृत्यूदर कमी ठेवण्यात सरकारला यश आलं असलं तरी नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं अन्यथा परिस्थिती बिकट होऊ शकते, अशा इशारा त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला आहे. राज्यातील मृत्यूदर ०.५ टक्क्यांच्या खाली आहे. तर देशाचा करोना मृत्यूदर हा १.३ टक्के इतका आहे.
केरळमध्ये करोना रुग्णांची एकूणसंख्या ६,६४००० हजारांवर गेली आहे. करोनामुळे राज्यात २,५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये शनिवारी करोनाचे ५९४९ नवीन रुग्ण आढळून आलेत. यापैकी ४७ आरोग्य कर्मचारी आहेत. तर ८३ जण हे इतर बाहेरून आलेले आहेत. तर ५,१७३ जण करोना बाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. तर ६४६ जणांना संसर्ग कसा झाला हे कळू शकलेलं नाही. शनिवारी राज्यात ३२ नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला.
मुंबई महापालिकेची तयारी
दरम्यान मुंबई महापालिकेने लसीचे तापमान मेन्टेन करण्यासाठी ३०० कोल्ड स्टोअरेज बॉक्सेस आधीच संपादीत केले आहेत. लस वेळेत आणि वेगात पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोटेशन सुविधेवर महापालिका काम करत आहे. लस स्टोअरेजची मध्यवर्ती व्यवस्था कांजूरमार्गमध्ये आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. त्यानंतर अन्य रुग्णालयांमध्ये लसी स्टोअरेजी सुविधा करण्यात येईल. मुंबईला लसीचे डोस कसे पोहोचवणार? ते अजून स्पष्ट झालेले नाही. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता मिळाली, तर पुण्याहून येणाऱ्या प्रत्येक गाडीला पोलिसांचे सुरक्षाकवच असेल. प्रत्येक शीतगृहाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असेल. सध्या जगभरात २६० लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. त्यात आठ लसींची भारतात निर्मिती होईल. त्यात तीन स्वदेशी लसी आहेत.