CoronamaharashtraUpdate : राज्यात ३ हजार ८२४ नवे करोनाबाधित तर ५ हजार ८ जण करोनामुक्त

राज्यात आज दिवसभरात राज्यात ३ हजार ८२४ नवे करोनाबाधित आढळले, तर ५ हजार ८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. याशिवाय, ७० रुग्णांचा करोनामुळे दिवसभरात मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ६८ हजार १७२ वर पोहचली आहे. याशिवाय, राज्यातील करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.५२ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ७१ हजार ९१० असून, १७ लाख ४७ हजार १९९ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ हजार ९७२ वर पोहचली आहे.
Maharashtra reported 3,824 new #COVID19 cases, 5,008 discharges & 70 deaths today.
Total cases: 18,68,172
Total recoveries: 17,47,199
Death toll: 47,972Active cases: 71,910
Recovery rate: 93.52% pic.twitter.com/q0txeRxABx— ANI (@ANI) December 10, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख २ हजार ४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ६८ हजार १७२ (१६.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४१ हजार ५९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ५ हजार १३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
दरम्यान राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहनही केले आहे. शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्यास मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्याचा इशारा
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल असा इशारा दिला आहे .
मुंबईचे आयुक्त म्हणाले की, परवा मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मी मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं.
पुणे शहरात दिवसभरात २५८ नव्या करोनाबाधितांची नोंद
पुणे शहरात दिवसभरात २५८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर १ लाख ७३ हजार १५५ एवढी एकूण करोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर आतापर्यंत ४ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात २५५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजअखेर १ लाख ६३ हजार ५५१ रुग्ण करोनामुक्त झाल्याची नोंद झालेली आहे.
दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ११४ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. २९४ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ९३ हजार ९२८ वर पोहचली असून, यापैकी, ९० हजार ४७३ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७९४ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.