बिहार : महाआघाडीच्या जागावाटपाची अखेर घोषणा, राजदला सर्वाधिक २० जागा

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर अखेर आज बिहार महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली असून लालू प्रसाद यादवांच्या पक्षाला ४० पैकी २० जागा मिळाल्या आहेत. तर बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यादव यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने संयुक्त जनता दलातून बाहेर पडलेले शरद यादव हे राजदच्या तिकिटावर लढणार आहेत.
महाआघाडीने जागावाटपाबरोबरच काही जागांवरील उमेदवारांची घोषणाही केली आहे. राष्ट्रीय जनता दलाला २० जागा, काँग्रेसला ९, रालोसपाला ५ आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाला ३ जागा मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त वीआयपीला ३ आणि राजदच्या कोट्यातून सीपीआयला १ जागा दिली जाणार आहे. नितिशकुमार यांच्यावर नाराज झालेल्या जेडीयुच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी राजीनामा देत लोकशाही जनता दलाची स्थापना केली होती. लोकसभेसाठी शरद यादव लालुंच्या राजदच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष राजदमध्ये समाविष्ट केला जाणार आहे, असे राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी सांगितले. उपेंद्र कुशवाहा यांनी एनडीएला सोडचिठ्ठी देत महाआघाडीची साथ दिली होती. यावेळी त्यांना राजदने पाच जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. अखेर हा तिढा सुटल्यामुळे महाआघाडीच्या प्रचाराला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.