MaharashtraEducationNewsUpdate : मोठी बातमी : राज्यातील शाळांचा निर्णय स्थानिक प्रशासनावर , मुंबई , ठाण्यातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय

राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र असे असले तरी शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान रुग्णसंख्या वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना या संदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणी असलेल्या शाळा ३१ तारखेपर्यंत बंदच राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यांमधल्या शाळा उघडल्या जाव्यात असे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र त्याचवेळी शाळा उघडण्याचा निर्णय त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनांनी घ्यावा असंही म्हटलं आहे. आजच ३१ डिसेंबरर्यंत मुंबईतील शाळा उघडणार नसल्याचा निर्णय झाला. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.