MaharashtraNewsUpdate : कोरोनाचा संभाव्य उद्रेक थांबविण्यासाठी मुंबई -दिल्ली प्रवासावर निर्बंध

दिल्ली आणि गुजरातमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. दरम्यान काही दिवस मुबई -दिल्ली रेल्वे आणि विमानसेवा खंडित करण्याच्या दृष्टीने राज्यशासनाच्या विचार विनिमय चालू असल्याचे वृत्त आहे. दिल्लीशी काही दिवस संपर्क तोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान गुजरातच्या अहमदाबादमध्ये आजपासून रात्री ९ ते पहाटे ६ पर्यंत कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शिवाय सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय सुद्धा मागे घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात मुंबई देशातील करोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला होता. दरम्यानच्या काळात कोरोनाची स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली असताना दिल्लीत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मुंबईकरांचीही धाकधूक वाढली आहे. त्यात आधीच दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळेच मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी वेळीच पावले उचलली जात आहेत. त्यातून दिल्ली-मुंबई प्रवास काही दिवस बंद केला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
दिली -मुंबई विमानसेवा आणि ट्रेनसेवा पुढचे काही दिवस बंद ठेवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी माहिती दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्ली-मुंबई विमानसेवा तसेच ट्रेनसेवा बंद ठेवता येतील का, याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. तसा प्रस्तावही असून तूर्त त्यावर केवळ चर्चा सुरू आहे. यात राज्य सरकारसोबतच रेल्वे, नागरी उड्डाण विभाग यांचीही परवानगी आवश्यक असल्याने संबंधितांशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे, असेही संजयकुमार यांनी स्पष्ट केले.