BiharGovtNewsUpdate : बारावी पास भाजप आमदाराला उपमुख्यमंत्री , अर्थमंत्री पदासह महत्वाची ६ खाती , असे आहे नितीश बाबू यांचे नावे सरकार !!

बिहारमध्ये एनडीए प्रणित नितीश सरकारचा सोमवारी शपथविधी झाल्यानंतर मंगळवारी खातेवाटप जाहीर झाले आहे. या मंत्रिमंडळ वाटपात राज्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले गृहखाते मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडेच आहे . दरम्यान नितीश यांच्या मंत्रीमंडळातील काही नावांमुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. खास करुन राज्याचे नवे अर्थमंत्री, शिक्षण मंत्री यांचा इतिहास पाहता खातेवाटपानंतर लगेचच विरोधकांनी नितीश सरकारवर निशाणा साधला आहे.
कोण आहेत भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद ?
या मंत्रिमंडळात अर्थ खात्यासह सर्वाधिक ६ मंत्रीपदे मिळालेले भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद अधिक चर्चेत आहेत आणि चर्चेचे कारण म्हणजे ते पहिल्यांदाच केवळ १०६ मतांनी आमदार म्हणून निवडून आलेले असून केवळ १२ वी पास आहेत . त्यांच्याकडे अर्थ, पर्यावरण, वन, महिती-तंत्रज्ञान या चार महत्वाच्या खात्यांबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, नगर विकास मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे. तारकिशोर प्रसाद यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या एनडीएने महागठबंधनचे नेते तेजस्वी यादव यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन अनेकदा टोले लागवल्याचे पाहायला मिळालं. तेजस्वी यांनी दहावी पर्यंतचेही शिक्षण पूर्ण केलेलं नाही असं अनेकदा प्रचारसभांमधून सांगण्यात आलं. मात्र आता सत्ता आल्यानंतर भाजपा आणि जदयुने १२ वी पास नेत्याला अर्थ खातं दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आरजेडीचे प्रमुख प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी तेजस्वी यांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना काय झालं. त्यांनी पहिल्यांदा मंत्री झालेल्या नेत्याला अर्थ खातं कसं काय दिलं असा प्रश्न विचारला आहे.
इतर वादग्रस्त मंत्री
दरम्यान नितीशबाबू यांच्या मंत्रीमंडळामध्ये मंत्रीपद मिळालेलं आणखीन एक नाव म्हणजे मेवालाल चौधरी. चौधरी हे सुद्धा वादग्रस्त नेतृत्व असून त्यांच्या खांद्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मेवालाल चौधरी २०१५ मध्ये पहिल्यांदा जेडीयूच्या तिकीटावर आमदार झाले होते. त्यापूर्वी ते शिक्षक म्हणून काम करायचे. चौधरी हे सबौर कृषि विश्वविद्यालयाच्या कुलपती असताना २०१२ साली सहाय्यक प्राध्यपक आणि कनिष्ठ संशोधकांची भरती करण्यात आली होती. मात्र या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. बिहारमध्ये १८ आणि इतर राज्यांमध्ये ८७ जणांना नियमांचे उल्लंघन करुन चौधरी यांनी नियुक्त केल्याचे आरोप करण्यात आले. सबौर पोलीस स्थानकामध्ये २०१७ साली या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये चौधरी यांना न्यायलयाने अंतरिम जामीन दिला होता. तसेच न्यायालयाने चौधरी यांच्याविरोधात चार्टशीट दाखल केली नव्हती.
कोरोना काळात पर्यटनावरून गाजलेल्या जीवेश कुमारांना पर्यटन मंत्री पद
याशिवाय नितीश यांच्या मंत्रीमंडळामध्ये जीवेश कुमार यांना पर्यटन, कामगार आणि खाण मंत्रालय देण्यात आलं आहे. जीवेश हे सुद्धा वादग्रस्त नेतृत्वांपैकी एक आहेत. जीवेश यांनी कोरोना कालावधीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकांवर निर्बंध लावण्यात आलेले असताना जीवेश मात्र दिल्लीपासून थेट दरभंगापर्यंत आले होते. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्येही दौरा केला होता. मात्र एवढं करुनही त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली नव्हती. एकीकडे दिल्ली-पंजाब आणि दक्षिणेतील राज्यांमधून बिहारमधील मजूर पायी चालत आल्यानंतर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र दुसरीकडे जीवेश यांना या सर्व नियमांमधून सूट देण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले.
१४ मंत्र्यांचा शपथविधी
मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत सामान्य प्रशासन आणि अन्य महत्त्वाची खाती नितीश कुमार यांच्याकडेच राहणार आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये १४ मंत्र्यांचा शपथविधी झाला. भाजपा आमदार आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांना पंचायत राज मंत्रालय देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मागास आणि अती मागास कल्याण तसेच उद्योग विभागाची जबाबदारीही रेणू देवींना देण्यात आली आहे. नितीश यांचे निकटवर्तीय असणाऱ्या विजय कुमार चौधरी यांना ग्रामविकास, जलंसंपदा, सूचना-जनसंपर्क तसेच संसदीय कार्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विजय कुमार चौधरी हे मागील विधानसभेमध्ये स्पीकर होते.
जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चौधरी यांना गृहनिर्माण, समाज कल्याण, अल्पसंख्यांक तसेच विज्ञान विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. विजेंद्र यादव यांना ऊर्जा, दारुबंदी, खाद्य तसेच ग्राहकांशी संबंधित उपभोक्ता विभागाशी संबंधित मंत्रालये देण्यात आली आहेत. शीला कुमारी यांच्याकडे परिवहन मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे. विकासशील इन्सान पार्टीचे नेते मुकेश सहनी यांना पशू तसेच मत्स्य संवर्धन मंत्रालय देण्यात आलं आहे. हिदुस्तानी अवाम मोर्चा या पक्षाचे नेते जीतन राम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन यांना लघू, जल संपदा, अनुसूचित जाती/जमाती कल्याण मंत्रालय देण्यात आलं आहे.