MarathawadaNewsUpdate : मराठवाड्यातील एका ज्येष्ठ नेत्याची भाजपाला सोडचिट्ठी

मराठवाड्यातील भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भाजपमध्ये कार्यरत होते. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी काम केले होते. बीड लोकसभा मतदारसंघातून ते तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातूनही त्यांनी दोनदा बाजी मारली होती. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद भूषवले होते. तसंच, केंद्रात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. सध्या ते भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मात्र ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते.
दरम्यान पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मराठवाडा विभागातून आपणास उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती त्यापूर्वी त्यांनी खासदारकीची आणि आमदारकीचे तिकीट मिळविण्याचाही प्रयत्न केला परंतु पक्षाने त्यांच्या नावाचा विचार केला नाही . त्यांनी पदवीधर मतदार संघातून अर्जही दाखल केला होता मात्र ते आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत.यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार म्हणून ते निवडूनही आले होते. मात्र, त्यानंतर ते पुन्हा स्वगृही परतले होते. ‘पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. काम दिलं जात नाही,’ असा आरोप त्यांनी केला आहे. त्या नाराजीतूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपाला सोडचिट्ठी देणारे ते एक महत्वाचे नेते होते. मराठवाड्यात त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे.