IndiaNewsUpdate : जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानने सणाची वेळ निवडली, भारताकडून कठोर शब्दात निंदा

भारताच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शुक्रवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे अत्यंत कठोर शब्दात भारताने निषेध नोंदवला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यात एका कॅप्टनसह लष्कराचे चार जवान आणि सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी शहीद झाला, तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानने सणाची वेळ निवडली, हे खूप खेदजनक असल्याचे शनिवारी भारताने म्हटले. या घटनेबद्दल पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलवून कठोर शब्दात निषेध नोंदवला असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात भारताने म्हटले आहे कि , “पाकिस्तानी सैन्याने जाणीवपूर्वक निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानने भारतातील सणाची वेळ निवडली. एलओसीवर पद्धशीरपणे गोळीबार केला. भारताने या कृत्याचा कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे” . भारतीय सीमांमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठीही पाकिस्तानकडून जे प्रोत्साहन दिले जाते आहे , त्याबद्दलही निषेध नोंदवला. पाकिस्तानने त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भूमीचा भारताविरोधात दहशतवादासाठी वापर करु द्यायचा नाही, या द्विपक्षीय कटिबद्धतेचीही पाकिस्तानला यावेळी आठवण करुन देण्यात आली.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारताने थेट क्षेपणास्त्र डागून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे लाँच पॅडस, बंकर्स उद्धवस्त केले. भारतीय लष्कराने या कारवाईचे अनेक व्हिडीओ सुद्धा जारी केले आहेत. भारतीय लष्कराने उरी, नागाव, तंगधर, केरन आणि गुरेझ सेक्टरमध्ये पसरलेल्या पाकिस्तानी बंकर्सना लक्ष्य केले. पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्याने थेट रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला.