WorldCoronaNewsUpdate : युरोपातील “हे” देश करीत आहेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना , एकाच दिवसात ६० हजार कोरोनाबाधित

भारतात अलीकडच्या काही दिवसात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असले तरी , कोरोनाच्या पहिल्या साथीवर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरलेल्या युरोपीयन देशांना मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे लॉकडाउन सुरू असतानाही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवसात ६० हजार कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जर्मनीमध्ये तर कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी एक महिन्यासाठी अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये एकाच दिवसात ६० हजार ४८६ नवीन कोरोनाबाधित आढळले असल्याचे वृत्त आहे. फ्रान्समधील एकूण करोनाबाधितांची संख्या १७ लाखांहून अधिक झाली आहे. त्याआधी एकाच दिवसात ५८ हजार बाधितांची नोंद करण्यात आली. ती सर्वोच्च संख्या होती. फ्रान्समध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे ३९ हजार ९१६ जणांना प्राण गमवावे लागले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने अंशत: लॉकडाउन सुरू केला आहे. लोकांना केवळ कामाच्या निमित्ताने घराबाहेर जाण्याची परवानगी आहे. बार, कॅफे, जिम आणि रेस्टॉरंट्स बंद करण्यात आली आहेत. एका महिन्यासाठी लॉकडाऊन लागू करून कोरोनाबाधितांची संख्या प्रति दिवस पाच हजारांवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
दरम्यान जर्मनीत सुरू असलेल्या अंशत: लॉकडाउनचा पहिला आठवडा पूर्ण होण्याआधीच एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण संख्येची नोंद झाली. शनिवारी, १९ हजार ५९ नवीन रुग्ण आढळले. जर्मनीत एका दिवसात आढळलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. जर्मनीत सुरू असलेला लॉकडाउन हा मार्च महिन्यापेक्षा कमी निर्बंधाचा आहे. रेस्टोरंट, बार, चित्रपटगृह आदी ठिकाणे बंद असून शाळा, सलून आणि दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र निर्बंधांमध्ये सक्ती नसल्यामुळेच बाधितांची संख्या वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या शिवाय सिंगापूरमध्ये रात्रीच्या वेळी काही मोजक्या आस्थापनांना दोन महिन्यांसाठी सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या थैमानामुळे पब, बार, हॉटेल जवळपास नऊ महिने बंद होते. आता त्यांना दोन महिने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ग्राहकांना मास्क अनिर्वाय करण्यात आले आहेत. त्याशिवाय अन्नपदार्थ खाण्याच्या व्यतिरिक्त इतर वेळी ग्राहक मास्कचा वापर करत आहेत की नाही, याची खबरदारी संबंधित आस्थापनांना घ्यावी लागणार आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत ५८ हजार ५४ जणांना करोनाची बाधा झाली असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे.