IndiaWorldNewsUpdate : नामांकित आंतरराष्ट्रीय वकील हरीश साळवे विवाहबद्ध

अखेर ठरल्याप्रमाणे नामांकित आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. काल २८ ऑक्टोबर म्हणजेच काल त्यांनी लंडनमधील चर्चमध्ये कॅरोलिन ब्रॉसार्डशी विवाहबद्ध झाले. हे या दोघांचंही दुसरं लग्न आहे. ६५ वर्षीय हरीश साळवे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट दिला होता. ३८ वर्षाच्या संसारात हरीश-मीनाक्षी साळवे यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.
ज्यांच्याशी हरीश साळवे विवाहबद्ध झाले त्या कॅरोलिन ५६ वर्षांच्या असून त्या व्यवसायाने कलाकार आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची भेट झाली होती. यानंतर या दोघांच्या भेटी वाढल्या. नंतर मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात झालं . हे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लंडनमधील चर्चमध्ये पार पाडलं. चर्चमधील या छोटेखानी विवाह समारंभात केवळ १५ लोक सहभागी झाले होते. ज्यात दोघांचे कुटुंबीय आणि काही खास मित्रपरिवार सहभागी होता.
हरीश साळवे यांचा जन्म १९५५ ला महाराष्ट्रात झाला. माजी केंद्रीय मंत्री एन के पी साळवे त्यांचे वडील होते . तर आई अमृती साल्वे डॉक्टर होत्या. परंतु हरीश साळवे यांनी वकील बनण्याचा निर्णय घेतला. माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे सहायक म्हणून त्यांनी आपल्या वकिलीची यशस्वी सुरुवात केली होती. हरीश साळवे हे देशातील प्रख्यात वकील आणि ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल आहेत. भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विनंतीवरुन त्यांनी पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद असलेल्या कुलभूषण जाधव यांचा खटला लढला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी केवळ एक रुपया मानधन घेतलं होतं. हरीश साळवे यांना ब्रिटन आणि वेल्सच्या न्यायालयात महाराणीचे वकील म्हणूनही नियुक्त केलं आहे. ज्यांनी वकिलीमध्ये कौशल्य प्राप्त केलंय अशाच वकिलांना हा मान मिळतो. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे ते वर्गमित्र आहेत.