HathrasGangRapeCase : सर्वोच्च न्यायालयात आज हाथरस प्रकरणात महत्वपूर्ण सुनावणी

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि प्रकरणातील तीन महत्वाच्या मुद्यांवर सर्वोच्च न्यायालय आज मंगळवारी निर्णय देणार आहे. या मध्ये या प्रकरणात होणारी चौकशी ही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करणार की अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ? तसेच या खटल्याची सुनावणी दिल्लीत घेतली जावी की नाही आणि पीडित आणि साक्षीदारांची सुरक्षा केंद्रीय दलांकडे द्यावी की नाही, या तीन महत्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांचे खंडपीठ या प्रकरणी निर्णय देणार आहे.
सदर खटल्याची सुनावणी दिल्लीत व्हावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात केली. हाथरस प्रकरणी एक जनहित याचिकाही दाखल केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीत चौकशी व्हावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. यूपीत खटल्याची चौकशी आणि सुनावणी योग्य होणार नाही, म्हणून हा खटला दिल्लीला हस्तांतरित करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान पीडित कुटुंब आणि साक्षीदारांचे तीन-स्तरीय संरक्षण दिलं जात असल्याचं उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं. हाथरसमध्ये १४ सप्टेंबरला १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा छळही केला गेला, असा आरोप आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि प्रशासनाकडून परस्पर पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंसकार करण्यात आल्याने या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते.