IndiaCrimeNewsUpdate : उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक बलात्काराचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणात दोघांनी एका ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली आहे. यातील पीडित मुलगी ४ वर्षाची असून तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी ९ आणि १२ वर्षाची मुले आहेत. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
सदर घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना गुरुवारी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक हाथरस जंक्शन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. दोन्हीही आरोपी मुले एकाच गावातील असून त्यांना अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. मुलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले
दरम्यान हाथरसमध्ये गेल्या महिन्यात एका १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. या दलित तरुणीवर तिच्याच गावात राहणाऱ्या चौघांनी कथित बलात्कार केला. बलात्कारानंतर या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर मोठी निदर्शने झाली. या प्रकणाचे पडसाद अमेरिकेत देखील उमटले. या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेशातील योगी सरकार सीबीआयच्याद्वारे करत आहे. सीबीआयने आपला तपास सुरू केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हाथरसमध्ये जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती.