चोरी करताना मोदी पकडले गेले त्यामुळे त्यांनी देशालाच चौकीदार बनवले : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी ट्विटर हँडलवर आपल्या नावाच्या आधी ‘चौकीदार’ शब्द जोडलाय. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. चोरी करताना मोदी पकडले गेलेत. यामुळे आता त्यांनी देशालाच चौकीदार बनवलंय. पण आपण पूर्ण देशाला चौकीदार करणार, असं पंतप्रधान मोदी कधीच म्हणाले नव्हते, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.
राफेल विमान खरेदीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार केलाय. मोदी जातात तिथे सांगतात मी चौकीदार आहे. पण आता ते देशालाच चौकीदार बनवायला निघालेत. मोदी नक्की कोणाची चौकीदारी करताहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला. मोदी केवळ अनिल अंबानी, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदींसारख्या उद्योगपतींची मदत करतात, असं राहुल गांधी म्हणाले.
‘मै भी चौकीदार’ अशी मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या शनिवारपासून सुरू केलीय. भ्रष्टाचार आणि समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढणारा मी एकटा नाही, तर संपूर्ण देश माझ्यासोबत आहे, असं मोदी म्हणाले. यासंबंधी मोदींनी तीन मिनिटांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर सोशल मीडियावरील सर्व साइट्सवर भाजपचे नेते आणि अनेक मंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर नावाच्या आधी चौकीदार लिहिले आहे.