CrimeNewsUpdate : हृदयद्रावक : तीन मुलींचा काटा काढून त्याने पत्नीलाही विष दिले आणि पसार झाला ….

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या तीन मुलींची हत्या केली. त्यानंतर त्याच्या पत्नीला जबरदस्तीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत घटनास्थळावरून पसार झाला. बुधवारी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. कच्छमधील मांडवी तालुक्यातील जखानिया गावात ही हादरवणारी घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाखू संघार उर्फ शिवजी (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या तीन मुलींची हत्या केली आणि त्यानंतर पत्नीला जबरदस्ती विष पाजले. धृप्ती (वय १०), किंजल (वय ७) आणि धर्मिष्ठा (वय २) अशी हत्या झालेल्या मुलींची नावे आहेत. त्यांची हत्या केल्यानंतर त्याने पत्नी भावना (वय ३३) हिला विष पाजले आणि फरार झाला. भावनाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले तेंव्हा आरोपी पसार झाला. शेजाऱ्यांनी भावनाला तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तिचा मृत्यू झाला.
दरम्यान शेजारी त्यांच्या घरी परतल्यानंतर घरात तिन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना कळवले. ‘शिवजी याने पत्नीला आधी विष पाजले आणि त्यानंतर तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेला . प्राथमिक तपासानुसार, आरोपीने मोठ्या मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच्या दोन लहान मुलींना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शरीरावर जखमाही होत्या. तसेच त्यांचे डोके भिंतीवर आदळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असे जखमांवरून दिसते. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे,’ अशी माहिती मांडवी पोलिसांनी दिली. आरोपी शिवजीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.