भाजपा नेत्याकडून प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यांची अवहेलना

लोकसभा निवडणुकीमुळे सध्या भाजपा आणि काँग्रेसमध्ये एकमेकांमवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सिकंदराबाद येथे आयोजित एका सभेत बोलताना महेश शर्मा यांनी राहुल गांधी यांचा पप्पू तर प्रियंका गांधी यांचा ‘पप्पी’ म्हणून उल्लेख केला. सभेत उपस्थित एका व्यक्तीने महेश शर्मा बोलत असताना व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून महेश शर्मा यांच्यावर टीका होत आहे.
‘संसदेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागच्या बाकावर बसलो होतो. राहुल गांधींनी डोळा मारलेलं पाहून मीदेखील घायाळ झालो होतो. आता पप्पू म्हणतोय की मला पंतप्रधान व्हायचं आहे. आणि आता तर पप्पूची पप्पीदेखील आली आहे. म्हणजे आता मायावती, अखिलेश यादव, पप्पू आणि पप्पूची पप्पीदेखील आली आहे’, असं वक्तव्य महेश शर्मा यांनी केलं आहे. या सर्वांना नरेंद्र मोदी हा एकच पर्याय आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणालेत की, ‘प्रियंका गांधी याआधी देशाची मुलगी नव्हती का? काँग्रेसची मुलगी नव्हती का ? अशी कोणती नवी गोष्ट त्या करणार आहेत ? याआधी ती सोनिया गांधींची मुलगी नव्हती का…पुढे राहणार नाही का ? आधी नेहरु, नंतर राजीव गांधी, नंतर संजय गांधी, नंतर राहुल गांधी आणि नंतर प्रियंका गांधी….भविष्यात अजून काही गांधी असतील. तुम्ही काय देशावर उपकार केले आहेत का?’.
‘जर ममता बॅनर्जी येथे येऊन कथ्थक नाचू लागल्या तर कोण त्यांचं ऐकणार आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी येथे येऊन गाणं गाऊ लागले तर कोण त्यांचं ऐकणार…यांच्याकडे 72 जागा आहेत, 200 कुठून आणणार’, असं महेश शर्मा यांनी म्हटलं आहे. यांना मजबूत सरकार नको असून दुर्बळ सरकार हवं असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.