CoronaWorldUpdate : खरोखरच , थंडीच्या काळात कोरोना वाढणार का ? असे आहे उत्तर ….

जगात सर्वत्र कोरोनावरून होणारी चर्चा सध्या तरी थांबेल असे चित्र नाही . एकीकडे कोरोनावरील प्रतिबंधक लसींचे निर्माण केले जात आहे तर दुसरीकडे त्याच्या संसर्गाविषयी शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. दरम्यान असे म्हटले जात आहे कि , युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून संसर्गाचा धोका अधिकच वाढला आहे. तर, दुसरीकडे आता हिवाळ्यात करोनाबाधितांची संख्या आणखी वाढणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. थंडीच्या दिवसात तोंडातील लाळेच्या तुषारकणांद्वारे करोनाचा संसर्ग अधिकच फैलावण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. आतापर्यंत जगभरात ११ लाख जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आता हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग तुषारकणांद्वारे पसरण्याची धोका आहे.
नुकत्याच समोर आलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. हे संशोधन Nano Letters या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टेसिंगच्या नियमांचे पालन केले जाते. मात्र, येणाऱ्या दिवसात सोशल डिस्टेसिंगच्या पर्यायाचा फार उपयोग होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या संशोधनात सहभागी असलेले संशोधक यानयिंग झू यांनी सांगितले की, कोरोनाचा फैलाव करू शकणारे लाळेचे तुषारकण ६ फूटांपेक्षा अधिक दूर जाऊ शकतात. उष्ण आणि कोरड्या ठिकाणी हे तुषारकण हवेच्या वाफेत रुपातरीत होतात. मात्र, त्यामध्ये असलेला विषाणू तसाच राहतो. हे विषाणू एअरोसॉलमध्ये मिसळून जातात. संशोधनाचे लेखक लेई झाओ यांनी सांगितले की, हे कण अतिशय लहान असतात. जवळपास १० मायक्रॉनपेक्षाही कमी आकाराचे असतात. त्याशिवाय अनेक तास हवेत हे कण राहतात. त्यामुळे या हवेत श्वास घेणाऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका आहे. दरम्यान, नायट्रोजन डायऑक्साइडच्या संपर्कात अधिक काळ राहिल्यामुळेसुद्धा कोरोना विषाणू अधिक घातक ठरू शकतो, असा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात करण्यात आला आहे.