MaharashtraNewsUpdate : आर्थिक अडचणीतून लोककलावंत विशाखा काळेची आत्महत्या

आर्थिक परिस्थितीला कंटाळून पुण्यात लोककलावंत आणि नृत्यांगना असलेल्या विशाखा काळे यांनी कल संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा महाराष्ट्राची लोकधारा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासह लावण्यांच्या कार्यक्रमातही काम केले होते. पुण्यातील हडपसर परिसरात त्या राहण्यास होत्या. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी तिचे आई-वडील आणि बहीण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याच वेळेस विशाखाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
विशाखा काळे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. तिच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार वर्षापूर्वी विशाखाचा अपघात झाला होता. या अपघातामुळे तीच्या चेहर्यावर काही जखमा झाल्या होत्या. त्यामुळे मागील एक वर्षभरापासून नैराश्यात होती. त्यात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे काही काम मिळत नव्हते. त्यामुळे नैराश्य वाढतच गेले आणि यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली आहे. विशाखाचे वडील अंध आहेत. आई एका शाळेत नोकरी करायची पण आता घर विशाखावरच अवलंबून होतं. वेगवेगळे स्टेज शो आणि लोककलांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विशाखा चरितार्थ चालवत होती. पण कोरोनाच्या काळात सगळी परिस्थिती पालटली. गेल्या ६ महिन्यात एकही कार्यक्रम होऊ शकलेला नाही. हाती असलेला पैसा संपत चालला आणि यामुळे कंटाळून विशाखाने टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे.