MarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरात मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येत्या १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद शांततेत केला जाणार आहे. ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, १५ दिवसांत सरकारनं निर्णय घेतला तर ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेऊ, असं मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी यापुढे ‘थोबाड फोडो आंदोलन’ करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे. विजयसिंह महाडिक पुढे म्हणाले की, मराठा समाज आता गनिमी काव्यानं आंदोलन करणार आहे. गोलमेज परिषदेत एकूण १५ ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. या गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ‘थोबाड फोडो आंदोलन’ करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही. आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरतीची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशीही केली मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान मराठा समाजाच्या आजच्या गोलमेज परिषदेनंतर येत्या 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये धनगर समाजानेही गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे.मराठा समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूरात महाराष्ट्रातील ४८ खासदार व मराठा समाजातील १८१ आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
गोलमेज परिषदेत संमत करण्यात आलेले ठराव:
1. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
2. मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.
3. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.
4. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.
5. सारथी संस्थेसाठी १ हजार कोटींची आर्थिक तरतूद करावी.
6. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी १ हजार कोटींची तरतूद करावी.
7. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी
8. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावे.
9. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.
10. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
11. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.
12. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
13. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
14. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.
15. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी.