लोकसभा २०१९ : आमदार अर्जुन खोतकर हाजीर हो !!! खोतकर मातोश्रीवर …

बहुचर्चित आमदार अर्जुन खोतकर यांना अखेर आज मातोश्रीचे बोलावणे आल्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर हजर झाले आहेत . त्यांच्या सोबत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती आहे . जालना लोकसभा मतदार संघात आपण उभे राहणार असल्याची आरोळी ठोकून सध्या खोतकर चर्चेच्या झोतात आहेत. त्यांच्या मुळे भाजप आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा जीव टांगणीला लागला आहे. दानवे आणि खोतकर यांच्या मध्यस्थी करण्याचे अनेक प्रयत्न स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पण त्याला यश आले नाही. आपल्याला सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले तरच आपण विचार करू अशी वक्तव्ये अर्जुन खोतकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती.
हा विषय अत्यंत गांभीर्याने घेत काल झलेल्या विदर्भ दौऱ्यात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आमदार अर्जुन खोतकर यांना आवरण्याची विनंती केली होती त्यानुसार मुंबईत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांना मातोश्रीवर पाचारण केले आहे. आता या चर्चेत उद्धव ठाकरे अर्जुन खोतकर यांना कुठला कानमंत्र देतात हे लवकरच समजणार आहे. जालना लोकसभा लढविण्याचा खोतकर यांच्यावर कार्यकर्त्याचा दबाव असल्याचे सांगण्यात येत असले तरी याप्रकरणात शेवटी अर्जुन खोतकर काय भूमिका घेतात यावरच सर्व काही अवलंबून आहे.