MarathaReservationMaharashtra : पोलीस भरतीत १३ टक्के राखीव जागा ठेवण्यासाठी प्रयत्नशील , अनिल देशमुख यांचे आश्वासन

सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील स्थगितीनंतर राज्यभरात सरकारविरोधात संतापाची लाट पसरलेली असतानाच सरकारने राज्यात १२ हजार ५२८ पोलिसांच्या मेगा भरतीचा निर्णय घेतला होता. काल हि घोषणा होताच मराठा समाज अधिकच आक्रमक झाला असून हि मेगा भरती थांबविण्याची मागणी होत आहे . यावरून खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या तीव्र भावना कळवल्या तर शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन , पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा रिक्त ठेवाव्यात अशी मागणी केली आहे. त्यावर अनिल देशमुख यांनी पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासून पाहू असे आश्वासन दिले आहे.
संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये. @OfficeofUT @CMOMaharashtra pic.twitter.com/BHMU0IF4As
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 17, 2020
राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ या वर्षामधील ५२९७ पदे तसेच २०२० वर्षामधील ६७२६ पदे व मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येणार आहेत.
याबाबत विनायक मेटे यांनी व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी रिक्त ठेवा. त्याच्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय घ्या आणि सुप्रीम कोर्टाची परवानगी घेऊन नंतर भरुन टाका. मराठा समाजातील तरुण-तरुणींना भरतीत सामावून करुन घेतलं तरच हे सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे असं म्हणता येईल. अन्यथा सगळी संतापाची प्रतिक्रिया रस्त्यावर पहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही”. दरम्यान अनिल देशमुख यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं म्हटलं आहे. “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासू. राज्य सरकाराचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे,” असं ते म्हणाले आहेत.