MaharashtraCoronaNewsUpdate : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची बाधा , नागपुरात कडक जनता कर्फ्यूचा निर्णय

Yesterday, I was feeling weak and consulted my Doctor. During the course of my check up, I have been tested COVID 19 positive. I am at present doing well with the blessings and good wishes of all. I have isolated myself.
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) September 16, 2020
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी यांनी स्वत:चं विलगीकरण केलं असून आपली प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “काल मला अशक्तपणा जाणवत असल्याने डॉक्टरांशी चर्चा केली. तपासणी केली असता मला करोना झाल्याचं स्पष्ट झालं. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसोबत मी सध्या व्यवस्थित आहे. मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्या आणि प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहा”.
दरम्यान नागपुरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरात कडक जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. महापौर संदीप जोशी तसंच आमदारांची मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्यासोबत आज महापालिकेत बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवार असे दोन जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली. दोन आठवड्यांसाठी हा कर्फ्यू लागू असणार आहे. महिनाअखेरीस बैठकीदरम्यान कालावधी वाढवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील डॉक्टरांनीही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात किमान १४ दिवसांची टाळेबंदी आवश्यक असल्याचं मत उच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं आहे.
याबात संदीप जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील पदाधिकारी, विरोक्षी पक्षनेते यांची आयुक्तांसोबतबैठक पार पडली. बैठकीत लॉकडाउनसंदर्भात चर्चा झाली. लोकप्रतिनिधींची लॉकडाउन संदर्भात मागणी होती. आयुक्तांचं मात्र मत वेगळं असून लॉकडाउन लावणं हिताचं नाही असं त्यांनी सांगितलं, लॉकडाउन लावल्यास अडचणी वाढतील असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंही लॉकडाउन लावण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे”. दरम्यान सर्वांच्या चर्चेअंती शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. येणारे पुढील दोन शनिवार-रविवार जनता कर्फ्यू कठोरपणे पाळण्याचा निर्णय झाला आहे. शनिवारी रात्री ते सोमवारी सकाळी साडे सात वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे. यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल,” असं संदीप जोशी यांनी म्हटले आहे.