MaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षणावर कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद

सर्वोच न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजात तीव्र भावना व्यक्त करण्यात येत असून या विषयावर मराठा आरक्षणासाठी २३ सप्टेंबरला कोल्हापूरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते आणि पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहेत. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील ४८ खासदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान राज्यातल्या काही मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा आकस असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी हा आरोप केलाय. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा पुण्यात १७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. मराठा आरक्षणासाठी आता उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेने दिला आहे. छावा संघटनेची मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची एक बैठक नांदेडमध्ये पार पडली. मराठा समाजातील तरुण आता विष घेऊन मरणार नसून मारणार असे जावळे म्हणाले. आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार नसल्याचे जावळे यांनी स्पष्ट केले. जबाबदार सत्ताधा-यांना मराठा समाज खाली खेचणार, असा इशारा जावळे यांनी दिला आहे.