AurangabadNewsUpdate : डॉक्टर महिलेची फसवणूक करणा-या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

औरंंंगाबाद : धुळ्याच्या महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या सहायक प्राध्यापकपदी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी आईसह मुलाने दाखल कलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी फेटाळुन लावला. शकुंतला चंद्रशेखर देशमुख (वय ५४) असे आईचे तर परेश चंद्रशेखर देशमुख (वय २७, दोघे रा. विद्याविहार कॉलनी, साखरी रोड, धुळे) असे आरोपींचे नाव आहे.
डॉ. अस्मिता शरद साळवे (वय ३६, रा. रविनगर, एन-११ हडको) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, आरोपी मनिष माटे (रा. एन-६, विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळ, सेंट्रल नाका), नितीन चंद्रशेखर देशमुख (रा. साक्री रोड, धुळे, ह.मु. साईसृष्टी को. ऑप. हाऊसिंग सोसायटी, चक्रधरनगर, पंचवटी, नाशिक), याचा भाऊ परेश देशमुख आणि त्यांची आई शकुंतला देशमुख (दोघे रा. विद्याविहार कॉलनी, साखरी रोड, धुळे) अशा चौघांनी डॉ. साळवे यांना धुळ्याच्या कुसुंबा येथील नर्मदाबाई नागो चौधरी या कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या सहायक प्राध्यापक पदी नोकरी लावुन देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर डॉ. साळवे यांच्याकडून १ ऑगस्ट २०१९ पासून आतापर्यंत १७ लाख रुपये घेतले. मात्र, नोकरी मिळत नसल्याचे पाहून डॉ. साळवे यांनी पैशांची मागणी केली. बराच दिवस तगादा लावल्यानंतर चौघांनी त्यांना नऊ लाख रुपये परत केले. पण आठ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.