Prakash Ambedkar : दे धक्का !! वंचित बहुजन आघाडीचे नवे “सोशल इंजिनियरिंग” अठरा -पगड जातींच्या उमेदवारांचा समावेश

बहुचर्चित वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीत राज्यातील अठरा पगड जातीतील वंचितांना स्थान देण्यात आल्याने खऱ्या अर्थाने प्रकाश आंबेडकरांनी वंचित घटकाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे . इतर सर्व पक्षांसाठी त्यांची हि घोषणा म्हणजे ” दे धक्का”च आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये . आता त्यांचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे . निवडणुकीच्या टप्प्यानुसार प्रकाश आंबेडकरांनी आपली पहिली यादी घोषित केली असून त्यात प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर उमेदवार कुठल्या जात समूहाचे प्रतिनिधित्व करणारा आहे याचा स्पष्ट उल्लेख केले आहे . यापूर्वी कधीही या समाजाला निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले नव्हते .
वंचित बहुजन आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा विविध जात समूहांना प्रतिनिधित्व देण्यात असून महाराष्ट्रात वंचितांचे सोशल इंजिनियरिंगचे एक वेगळे राजकीय समीकरण त्यांनी मांडले आहे . यात सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेश आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांत जाहीर सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. आघाडीच्या संभांना मिळणार प्रतिसाद महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेचा विषय राहिला आहे . या आघाडीमुळे प्रस्थापितांच्या सर्वच आघाड्यांसमोर प्रकाश आंबेडकर यांनी तागडे आव्हान उभे केले आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आघाडी यांच्यात कोणताही समझौता न झाल्याने धर्मनिरपेक्ष मतांचे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊन या आघाडीचा फायदा भाजप-सेनेला होईल या आरोपांना खोडून काढीत हा आरोप खरा नसून वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका भाजप-सेना आघाडीला बसणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी बीबीसी फेसबुक लाईव्हशी बोलताना केला आहे. वंचित आघाडीच्या वतीने आज घोषित करण्यात आलेल्या जागांमध्ये पहिल्या टप्प्यातील ६ (११ एप्रिल), दुसऱ्याटप्प्यातील ८ (१८ एप्रिल), तिसऱ्या टप्प्यातील १२ (२३ एप्रिल), चौथ्या टप्प्यातील ११ (२९ एप्रिल)अशा जागा घोषित करून सर्वच पक्षांना देधक्का दिलाआहे.