SangaliNewsUpdate : SadNews : कोरोनामुळे उद्ध्वस्त झाले संपूर्ण कुटुंब , कुटुंबप्रमुखाची आत्महत्या , मुलाचाही मृत्यू ….

कोरोना संसर्गामुळे त्रस्त होऊन सांगली जिल्ह्यातील दूधगाव येथे एक कुटुंब संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. कुटुंबातील सर्वांनाच करोनाची लागण झाल्याने घाबरलेल्या ५६ वर्षीय कुटुंब प्रमुखाने काल दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, तर ३० वर्षीय मुलाचा आज सकाळी करोनावर उपचार सुरू असताना मिरज येथील रुग्णालयात मृत्यू झाला. घरातील इतर चार कोरोना बाधितांवर घरातच उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे हे कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या विषयी अधिक माहिती अशी कि , दूधगाव (ता. मिरज) येथील एका कुटुंबातील सहा जणांना करोनाचा संसर्ग झाला. यातील ३० वर्षीय तरुणाची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या आई-वडिलांसह भाऊ, पत्नी आणि चार वर्षीय मुलीवर घरातच उपचार सुरू होते. या सर्वांना संसर्गाची सौम्य लक्षणे जाणवत होती. एकाच वेळी घरातील सगळ्यांनाच करोनाचा संसर्ग झाल्याने घाबरलेले ५६ वर्षीय कुटुंबप्रमुख तणावात होते. शनिवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठण्यात वर्दी दिली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर आरोग्य यंत्रणांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान कुटुंबप्रमुखाच्या आत्महत्येनंतर अवघ्या काही तासातच या कुटुंबाला दुसरा धक्का बसला. उपचारासाठी दाखल केलेल्या मुलाची प्रकृती रविवारी सकाळी अधिकच खालावली. यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच त्याची आई, भाऊ आणि पत्नीला मानसिक धक्का बसला. करोना संसर्गामुळे कुटुंबाला मुलाचा चेहराही पाहता आला नाही. आरोग्य यंत्रणांनी कुटुंबीयांच्या परवानगीने परस्पर अंत्यसंस्कार केले. त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ, पत्नी आणि चार वर्षांची मुलगी असा परिवार आहे. चोवीस तासांच्या आत एकाच कुटुंबातील दोन कर्ते पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.