MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अशा आहेत बदललेल्या तारखा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा , दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- 2020 या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पुन्हा जारी करण्यात आले आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर २०२०, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२२ नोव्हेंबर २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहेत. दरम्यान दुय्यम सेवा अराजपत्रित गट ही परीक्षा मात्र नीटसोबत क्लॅश होत असल्याने ही लांबणीवर पडली होती. आता ती आणखी लांबणीवर गेली आहे. सप्टेंबर महिन्यात करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचे आयोजन न करता ते आता ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पुढे गेले आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा करोना संसर्गाच्या व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी पुढे ढकलण्यात येऊन परीक्षांचे सुधारित दिनांक संदर्भिय प्रसिद्धीपत्रकानुसार जाहीर करण्यात आले होते. आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या अनुषंगाने विविध प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने आयोगाकडून ३१ ऑगस्ट २०२० व ४ सप्टेंबर २०२० पत्राद्वारे शासनाकडे संदर्भ करण्यात आला होता. त्यास अनुसरून शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भिय दिनांक ४ सप्टेंबर २०२० च्या परिपत्राद्वारे आयोगास कळवण्या आले आहे की, “आयोगाच्या परीक्षा आयोजनाबाबत शासनाने २६ ऑगस्ट २०२० च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय सदर पत्राद्वारे अयोगास अवगत करण्यात येत आहे की कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”