Shameful : ३४ हजार भरले , व्हेंटिलेटर मिळाले नाही, शेवटी मृत्यू झाला आणि मृतदेहाचे काय झाले तुम्हीच पहा…

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरातून मानवी देहाची विटंबना झाल्याचे वृत्त असून नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत करोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची प्रचंड हेळसांड सुरू आहे. अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराने इस्लामपूर नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाविषयी संतापाची भावना व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचे जिवंतपणीही हाल होत आहेत आणि मृत्यूनंतरही मृतदेहाची विटंबना अशी विटंबना होत आहे हि चिंताजनक बाब आहे.
या विषयी अधिक माहिती अशी कि , इस्लामपूर नगरपरिषदेच्या कापुसखेड नाका परिसरातील स्मशानभूमीत करोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या १५ दिवसांपासून मृतांची संख्या वाढत असल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या यंत्रणा कोलमडल्या आहेत. इस्लामपूरमधील गंभीर प्रकार एका मृताच्या नातेवाईकानेच मोबाइलमध्ये चित्रीत करून तो सोशल मीडियात व्हायरल केला. या व्हिडिओत कुत्र्याकडून अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडले जात आहेत. शिराळा तालुक्यात व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने नातेवाईकांनी रुग्णाला इस्लामपूर शहरातील एका कोव्हिड उपचार केंद्रात दाखल केले होते. ३४ हजार रुपये भरून घेतल्यानंतरही रुग्णाला व्हेंटिलेटर मिळाले नाही. गुरुवारी सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इस्लामपूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवला.
दरम्यान नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत अंत्यसंस्काराचे सोपस्कार उरकले. यानंतर दुसरा मृतदेह आणण्यासाठी ते निघून गेले. दरम्यान, स्मशानभूमीत आलेल्या नातेवाईकांना अर्धवट जळालेला मृतदेह पाहून धक्का बसला. गंभीर बाब म्हणजे एक भटके कुत्रे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडत होते. हा सर्व प्रकार पाहून नातेवाईकांनी मोबाइलवर चित्रीकरण केले. या व्हिडिओद्वारे त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हा प्रशासनाला जाब विचारला आहे. उपचाराअभावी रुग्णांना जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मृत्यूनंतर त्यांचा अखेरचा प्रवास तरी योग्य पद्धतीने व्हावा, अशी अपेक्षा नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. तसेच मृतदेहांची हेळसांड होण्यासाठी पालकमंत्री की प्रशासन जबाबदार आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.