MaharashtraEducationUpdate : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी….

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ऑक्टोबर महिन्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी माहिती दिली. शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थीची फेरपरीक्षा ही बहुतेक वेळा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. पण, यंदा कोरोनाचं संकट असल्यानं ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कदाचित ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्या घेण्यात येण्याची शक्यता आहे. दहावीमध्ये जवळपास एक लाख २५ हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये एक लाख ८० हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एटीकेटी देखील प्राप्त झाले आहेत. दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची परवानगी आहे. मात्र, नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत, वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.