MaharashtraNewsUpdate : ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या ” कोव्हीशिल्ड” लसीचे पुण्यात प्रात्यक्षिक

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूट यांनी विकसित केलेल्या कोव्हीशिल्ड या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील बहुप्रतिक्षित मानवी चाचणीला पुण्याच्या भारती रुग्णालयात अखेर बुधवारी प्रारंभ झाला. नियोजित पाचपैकी दोघा पुणेकर स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली असून पुण्यातील ३५० स्वयंसेवकांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्या दोघांना आता २८ दिवसांनंतर पुन्हा लस टोचली जाईल. तोपर्यंत होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण केले जाणार आहे. ही देशातील पहिली मानवी चाचणी असल्याचे मानले जाते.
दरम्यान कोरोनाला प्रतिबंध करणारी लस कधी उत्पादित होणार इथपासून ते ती बाजारात कधी उपलब्ध होणार याच्या चर्चा देश पातळीवर सुरू झाल्या आहेत. नुकतीच केंद्र सरकारने पुण्याच्या आघाडीच्या सिरम इन्स्टिट्यूटला मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीला मान्यता दिली. त्यानुसार पुण्यातील भारती रुग्णालयात मानवी चाचणीला बुधवारपासून प्रारंभ झाला.विशेष म्हणजे पुण्यातील उत्पादकांच्या लसीच्या चाचणी पुण्यात पुणेकर स्वयंसेवकावर होत आहे. ”कोव्हीशील्ड’ लशीच्या भारतातील चाचण्यांची सुरुवात बुधवारी भारती रुग्णालयात दिलेल्या लशीपासून झाली आहे. रुग्णालयात सुमारे ३५० स्वयंसेवकांना लस देण्यात येणार असून हे सर्व स्वयंसेवक १८ वर्षांवरील निरोगी महिला आणि पुरुष आहेत. सर्व स्वयंसेवकांची करोना चाचणी तसेच प्रतिपिंड चाचणी करुन त्यानंतर त्यांना लस देण्यात येणार आहे,’ अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.