MaharashtraNewsUpdate : ताजी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याच्या मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० ही २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा यापूर्वीही एकदा नव्हे तर दोन वेळा लांबणीवर पडली होती. दरम्यान राज्य सेवा पूर्व परीक्षेव्यतिरिक्त महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही ११ ऑक्टोबर रोजी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान ही परीक्षा याआधीही दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. पहिल्यांदा ही परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार एमपीएससी पूर्व परीक्षा सर्वात आधी ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन १३ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले. तसे परिपत्रक १७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र १३ सप्टेंबरलाच नॅशनल एलिजीबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट आयोजित करण्यात आली. त्यामुळे एमपीएससी पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर ऐवजी रविवार २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता राज्यातील कोविड-१९ स्थितीमुळे केवळ पूर्व परीक्षाच नव्हे तर या दरम्यानच्या काळातील एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.