MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्री निधीचा मुख्यमंत्र्यांकडून काटकसरीने होतो आहे वापर ! कसा ते पहा…

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अखत्यारीतील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात देणगीदारांच्या मदतीने 541.18 कोटी रुपये जमा झाले असले तरी त्यांनी या निधीतून प्रत्यक्षात फक्त 132.25 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रक्कमेचा तपशील मागविला होता. त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने जमा -खर्चाची माहिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण जमा झालेल्या रक्कमेच्या 24.43 टक्के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खर्च केले असून 75.57 टक्के रक्कम अशीच शिल्लक आहे.
उपलब्ध माहितीनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहाय्यक लेखापाल मिलिंद काबाडी यांनी अनिल गलगली यांना एकूण जमा रक्कम व वाटपाची माहिती दिली. 3 ऑगस्ट 2020 पर्यंत एकूण 541.18 कोटी रुपये जमा झाले आहेत. या रक्कमेपैकी फक्त 132.25 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. खर्च झालेल्या रक्कमेपैकी 20 कोटी रुपये सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबईला देण्यात आले असून 3.82 कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आले आहेत. औरंगाबाद येथील रेल्वे अपघातातील 16 मजुराला प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे मृत व्यक्तीला 80 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. 36 जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांचे रेल्वेचे भाडे 88.64 इतके दर्शविण्यात आले आहे. जालना आणि रत्नागिरी येथे कोविड लॅबोरेटरीसाठी प्रत्येकी 1.07 कोटी देण्यात आले आहेत तर कोविड रुग्णांच्या प्लाझ्मा उपचारासाठी रु 16.85 कोटी रुपये हे वैद्यकीय शिक्षण विभागास दिले गेले आहे.