IndiaNewsUpdate : केरळमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समूहाला देण्यास विरोध , मोदी सरकारला मुख्यमंत्री विजयन यांचा दणका

Kerala Assembly passes 'unanimous resolution' demanding withdrawal of Centre's decision to lease out international airport in Thiruvananthapuram
— Press Trust of India (@PTI_News) August 24, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांचे कंत्राट अदानी समुहाला देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता मात्र केरळ विभानसभेने सोमवारी तिरुअनंतपुरम येथील विमानतळ अदानी उद्योग समुहाला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव संमत केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारने फेरविचार करावा सल्ला दिला आहे. दरम्यान राज्य सरकारने विमानतळाच्या कारभारातील काही वाटा अदानी समुहाला देण्याची तयारी दर्शवलेली असतानाही केंद्राने हे विमानतळ खासगी कंपनीच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे विजयन यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या देखभालीचे हक्क २०१९ साली खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी उद्योग समुहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान विधानसभेचे विरोधीपक्ष नेते रमेश चेन्नईथाला यांनीही राज्य सरकारच्या या ठरावाला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी राज्य सरकारचे धोरण हे दुतोंडी असल्याची टीका केली आहे. एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक पद्धतीने अदानी समुहाला विरोध करते तर दुसरीकडे छुप्या पद्धतीने त्यांना मदत करत असल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे. तसेच या विमानतळाची देखभाल करण्यासाठी सीआयएएल म्हणजेच कोच्चीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडची नियुक्ती का करण्यात आली नाही असा सवालही रमेश यांनी उपस्थित केला आहे. यामागे अदानी ग्रुपला पाठिंबा देण्याचा डाव असल्याची शक्यता रमेश यांनी व्यक्त केली आहे. “राज्याचे हित लक्षात घेता आम्ही या ठरावाला पाठिंबा देत आहोत,” असं त्यांनी या ठरावाला पाठिंबा देताना सांगितलं आहे. मात्र तरीही या विषयावर मुख्यमंत्री आपली बाजू मांडण्यासाठी उभे राहिले असता विरोधी पक्षाच्या बाकांवरील नेत्यांनी आवाज करुन आपला निषेध नोंदवल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री विजयन यांनी विमातळाबद्दल राज्य सरकारची भूमिका कायमच स्पष्ट होती असं सांगितलं. विजयन यांनी सरकारची बाजू मांडल्यानंतर विधानसभेचे स्पीकर पी. श्रीरामकृष्णन् यांनी एकमताने ठराव संमत केला जात असल्याची घोषणा केली. दरम्यान हा ठराव एकमताने संमत करताना भाजपाचा सभागृहातील एकमेव सदस्य असणाऱ्या ओ. राजगोपालन यांनी आपल्याला बोलू दिलं नाही असे म्हटले असले तरी भाजपाचे केरळमधील प्रमुख नेते के. सुदर्शन यांनीही “विमानतळ विषयासंदर्भात आम्ही राज्याच्या जनतेसोबत आहोत,” असं प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मंजूर झाल्यानंतर यासंदर्भात पुढील पावलं कशी उचलावित यासंदर्भात चर्चेसाठी पुन्हा सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. तिरुअनंतपुरम विमानतळाच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याचा निर्णय केंद्राने मागे घ्यावा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. मात्र केंद्राने तिन्ही विमानतळं ही अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतला आहे.