IndiaSportsNewsUpdate : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

खेळाडूंसाठी प्रतिष्टेचा मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला जाहीर झाला आहे. त्याच्यासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकीपटू रानी रामपाल यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, १३ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, २७ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, १५ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले.
२०१९ विश्वचषकात रोहित शर्माने ५ शतकं झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता BCCIने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं. भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरातील क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो.
दरम्यान यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी या पाच खेळाडूंची शिफारस तीन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत क्रीडापटूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. या आधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
रोहित शर्मा – क्रिकेट
मरियप्पन थंगवेलू – पॅरा अॅथलीट
मनिका बत्रा – टेबल टेनिस
विनेश फोगाट – कुस्ती
रानी रामपाल – हॉकी
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)
धर्मेंद्र तिवारी – तिरंदाजी
पुरुषोत्तम राय – अॅथलेटिक्स
शिव सिंग – बॉक्सिंग
रोमेश पठानिया – हॉकी
क्रिशन कुमार हुडा – कबड्डी
विजय मुनीश्वर – पॅरा पॉवरलिफ्टिंग
ओम प्रकाश दहिया – कुस्ती
द्रोणाचार्य पुरस्कार
ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन – हॉकी
योगेश मालवीय – मल्लखांब
जसपाल राणा – नेमबाज
कुलदीप कुमार हांडू – वुशू
गौरव खन्ना – पॅरा बॅडमिंटन
अर्जुन पुरस्कार
ईशांत शर्मा – क्रिकेट
दीप्ती शर्मा – क्रिकेट
अतनू दास – तिरंदाजी
द्युती चंद – अॅथलेटिक्स
सात्विक रानकीरेड्डी – बॅडमिंटन
चिराग शेट्टी – बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी – बास्केटबॉल
लवलीना बोर्गोहेन – बॉक्सिंग
सुभेदार मनीष कौशिक – बॉक्सिंग
अजय सावंत – घोडेस्वारी
संदेश जिंगन – फुटबॉल
अदिती अशोक – गोल्फ
आकाशदीप सिंग – हॉकी
दिपिका – हॉकी
दीपक हुडा – कबड्डी
सारिका काळे – खो खो
दत्तू भोकनळ – रोईंग
मनू भाकर – नेमबाजी
सौरभ चौधरी – नेमबाजी
मधुरीका पाटकर – टेबल टेनिस
दिविज शरण – टेनिस
शिवा केशवन – हिवाळी खेळ
दिव्या काकरान – कुस्ती
राहुल आवारे – कुस्ती
सुयश जाधव – पॅरा स्विमिंग
संदीप – पॅरा अॅथलीट
मनीष नरवाल – पॅरा नेमबाज