WorldCoronaNewsUpdate : जाणून घ्या रशियाच्या कोरोनावरील ‘स्पुटनिक – व्ही’ लसीची प्रगती

जगभरात चर्चेत असलेल्या रशियाने विकसित केलेल्या ‘स्पुटनिक – व्ही’ लसीची पुढच्या आठवडयापासून मोठया प्रमाणावर चाचणी सुरु होणार आहे. परदेशी संशोधन संस्थेच्या देखरेखीखाली जवळपास ४० हजार लोकांवर या लसीची चाचणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पहिल्या दोन फेजमध्ये शंभर पेक्षा कमी लोकांवर ‘स्पुटनिक – व्ही’ लसीची चाचणी घेण्यात आली आहे. ‘स्पुटनिक’ हा पहिला उपग्रह रशियाने अवकाशात पाठवून अमेरिकेला धक्का दिला होता. त्यामुळे याच उपग्रहाचे नाव या लसीला देण्यात आले आहे. या महिन्यातच या लसीबद्दलची माहिती जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार आहे. मॉस्को स्थित गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस बनवली आहे. रॉयटर्सने वृत्त दिले आहे.
रशियातील ४५ वैद्यकीय सेंटरवर ४० हजार लोकांवर चाचणी करण्यात येणार असल्याचे गामालिया इंस्टिट्यूटच्या संचालकांनी सांगितले. ‘स्पुटनिक – व्ही’ लसी संदर्भातील सर्व माहिती जागतिक आरोग्य संघटना तसेच रशियन लसीमध्ये इच्छुक असलेल्या भारत, संयुक्त अरब अमिराती, ब्राझील, सौदी अरेबिया आणि फिलीपाईन्स या देशांना देणार आहोत असे RDIF चे मुख्य अधिकारी किरिल दिमित्रेव यांनी सांगितले. या लसीचे अब्जावधी डोस देण्यासाठी अनेक देशांकडून प्रस्ताव आल्याचे रशियाने म्हटले आहे.
रशियाकडे वर्षाला उत्पादन भागीदारीमधून ५० कोटी लसींची निर्मिती करण्याची क्षमता आहे. रशियामध्ये या लसीचे उत्पादन सुरु झाले आहे. डॉक्टर, आरोग्य सेवक, शिक्षक यांना लसीकरणामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. लस करोना व्हायरसपासून सुरक्षितता प्रदान करते असा रशियाचा दावा आहे. स्वत: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या मुलीला या लसीचा डोस दिला व लस सुरक्षित असल्याचा दावा केला. रशियन लस सुरक्षित आणि विश्वसनीय आहे. माझ्या ९० वर्षीय आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला ही लस देण्यात आली,” अशी माहिती दिमित्रेव यांनी दिली. रशियाने तिसऱ्या फेजची चाचणी घेण्याआधीच लसीला मंजुरी दिल्यामुळे त्यांच्यावर मोठया प्रमाणावर टीका सुरु आहे. इतक्या कमी कालावधीत लस बनवल्यामुळे जगातील अनेक तज्ज्ञांनी रशियाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.