IndiaCrimeUpdate : चार वर्षीय बालकाचा ‘बळी’ दिल्याप्रकरणी दोन महिलांना फाशीची शिक्षा

बिहारमध्ये तीन वर्षांपूर्वी चार वर्षीय बालकाचा ‘बळी’ दिल्याप्रकरणी गोपालगंजमधील कोर्टानं दोन महिलांना फाशीची शिक्षा सुनावली. संकेशा देवी (वय ४०) आणि दुर्गावती देवी (वय ६०) अशी या दोघींची नावे आहेत. सुनावणी दरम्यान नोंदवलेल्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे चतुर्थ अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश लवकुश कुमार यांच्या कोर्टाने दोन्ही आरोपी महिलांना दोषी घोषित करून सोमवारी या दोघींना फाशीची शिक्षा सुनावली.
गोपालगंज जिल्ह्यातील विजयीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छितौना गावात ५ सप्टेंबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. गावातील विनोद साह याचा चार वर्षांचा मुलगा देव कुमार हा दुपारी दोन वाजता आपल्या घराच्या दरवाजाबाहेर खेळत होता. त्याचवेळी गावातील एक महिला चिमुकल्याजवळ गेली आणि त्याला आईसक्रीम देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले. त्यानंतर ती त्याला पळवून घेऊन गेली. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी परतला नाही. त्यामुळे पालकांनी त्याला सर्वत्र शोधले. बरेच तास त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी या चिमुकल्याचा मृतदेह विनोद साहच्या घरामागे सापडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. बालकाच्या मृतदेहाजवळ एक चाकू सापडला होता. त्याच चाकूने मुलाची गळा चिरून हत्या केली होती.
या प्रकरणी विनोद साह याने तक्रार दाखल केली होती. विजयीपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यात गावातीलच सरजू साह याची पत्नी दुर्गावती देवी आणि त्याची सून संकेशा देवी यांच्यावर आरोप करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपी महिलांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. या दोन्ही आरोपी महिलांना दोषी घोषित करून सोमवारी या दोघींना फाशीची शिक्षा सुनावली.