MahanayakNewsUpdate : एक नजर : गल्ली ते दिल्ली : निवडक बातम्या…..

नमस्कार / जय संविधान…
महानायक ऑनलाइनच्या गल्ली ते दिल्ली या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत.
पाहुयात महत्वाच्या आणि निवडक बातम्या.
प्रारंभी ठळक बातम्या….
१. काँग्रेस -भाजप यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध , भाजपचे अध्यक्ष जे . पी . नड्डा यांचा राहुल -सोनियावर पलटवार
२. राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार , कोल्हापुरातील सर्व धरणे भरली , येत्या २४ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता
३. शरद पवार यांनीही करून घेतली कोरोना टेस्ट , सिल्व्हर ओक मधील १२ जणांना कोरोनाची लागण
४. महाराष्ट्रातील सर्व व्यवहार सुरळीत करा , लॉकडाऊन मागे घ्या , सार्वजनिक वाहतूक सेवा तातडीने सुरु करा : प्रकाश आंबेडकर यांची मागणी.
आणि …
५. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचं निधन
पाहुयात सविस्तर बातम्या….
भाजप आणि काँग्रेसमध्ये सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध सुरु असून कॉंग्रेस नेते राहुल गांधी , सोनिया गांधी , प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवरून अनेक आरोप केले जात आहेत . या आरोपांना भाजपकडून , संघाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे . फेसबुकच्या पक्षपातीपणावरून तर काँग्रेसने भाजपला चांगलेच घेरले आहे .
दरम्यान राहुल गांधी यांनी “पीएम केअर्स फंडा” वरून सरकारवर हल्लाबोल करताना यांनी या फंडाचे वर्णन ‘राइट टू इम्प्रोबिटी’ असे केले होते. या टीकेला उत्तर देताना भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एकामागून एक ट्विट करून सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या या उपक्रमावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे, असे सुनावले आहे.
दुसरी बातमी पावसाची….
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातला असून येत्या २४ तासांत मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आणखी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सक्रीय आहे. त्यामुळं या भागात पावसाचा मुक्काम लांबला आहे. कोकण आणि घाट माथ्याच्या भागात दाट ढग आल्यामुळे सातारा आणि पुणे या भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, मराठवाड्यात पुर परिस्थितीची शक्यता असल्याचं , हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
तिसरी बातमी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरून…
कोरोनाची परवा न करता महाराष्ट्र पिंजून काढणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी करोनाने शिरकाव केला आहे. ‘सिल्व्हर ओक’ येथील १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन दुःखदायक बातम्या…
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचं निधन झाल्यानं देशात आणि महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल सायंकाळी निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी आली तर त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या निधनाचं वृत्त धडकलं . या दोघांनाही अनेक मान्यवरांनी आणि संगीत आणि शास्त्रीय गायनाच्या रसिकांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही जैसे थे असली तरी स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या ‘आर्मी रिसर्च अॅन्ड रेफरल हॉस्पीटल’च्या डॉक्टरांनी आणि त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी दिली आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे . गेल्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी त्यांना गंभीर परिस्थितीत ‘आर्मी रिसर्च अॅन्ड रेफरल हॉस्पीटल’मध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ आढळल्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्रक्रिया पार पडली होती. दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
शेवटी बातमी कोरोनाविषयी .
राज्यासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे . राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८ हजार ४९३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ५५ हजार २६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कालच्यापेक्षा आज राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याची माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या 18 हजार 853 असून काल दिवसभरात 64 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे . दरम्यान 4 हजार 41 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. औरंगाबादची चिंताजनक बातमी म्हणजे तीन वर्षीय बालकासह काल औरंगाबादेत ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ५९५ इतकी झाली आहे. दरम्यान औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची बदली झाल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण रुजू झाले आहेत . चव्हाण यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
शेवटी बातमी सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेची
देशातील नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील असे म्हटले असल्याने या परीक्षा देणारांचा मार्ग मोकळा झाला आहे .
आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात .
अशाच महत्वाच्या आणि निवडक बातम्यांसाठी तुम्ही लॉग ऑन राहा महानायक ऑनलाईन डॉट कॉमवर आणि महानायक ऑनलाईन या ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
तोपर्यंत नमस्कार / जय संविधान.