CoronaIndiaUpdate : भाजप खासदारांचा कोरोनावर महत्वाच्या सल्ला , अंग चिखलाने माखून घ्या आणि खूप शंख वाजवा….

भाजपमध्ये अनेक प्रतिभावान लोक आहेत. त्यांच्या पक्षाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना, ‘‘आपल्या वैज्ञानिकांची प्रतिभा ऋषीमुनींसारखी सारखी असल्याचे सांगून देशाच्या आरोग्य सेवेला प्राचीन काळाशी जोडण्याचा प्रयत्न केला तर, दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे खासदार , आमदार आणि मंत्रीही कोरोनापासून दूर राहण्यासाठी अनेक मात्रा आणि तंत्र मंत्र सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. याच मालिकेत सध्या आणखी एक भाजप खासदार त्यांच्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या सूचनेचा आदर करून सरकारने आता ठिकठिकाणी चिखल टॅंक सुरु करायला आणि शंख वाटप करायला हरकत नाही.
या व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप खासदार सुखबीरसिंह या व्हिडीओमध्ये चिखलाने अंघोळ करताना आणि शंखनाद करताना दिसत आहेत. कोरोनाची भीती बाळगू नका. नैसर्गिक गोष्टीपासून आपण खूप लांब राहातो. निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. चिखलानं अंघोळ केल्यानं आणि शंख वाजवल्यानं कोरोनाचा संसर्ग होणार नाही असाही दावा त्यांनी केला आहे. या गोष्टी केल्यानं कोरोना तुमच्यापासून दूर राहिलं असं भाजप खासदार सुखबीरसिंह म्हणतात. त्यांच्या या अजब दाव्यामुळे सध्या ते तुफान चर्चेत आहेत.
खा . सुखबीरसिंह यांच्या आधी खा. प्रज्ञासिंग ठाकूर यांनीही आपला सल्ला दिला होता . त्यानंतर राजस्थानमधील केंद्रीय मंत्र्यांनीही कोरोनापासून दूर राहण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला दिला होता, सध्या ते कोरोनाबाधित असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यानंतर आता भाजप खासदार सुखबीरसिंह यांनी हा अजब दावा केला आहे. गोळ्या घेऊन रोगप्रतिकार शक्ती वाढणार नाही. त्यासाठी भरपूर खाल्लं पाहिजे, फिरलं पाहिजे, खेळलं पाहिजे, शेतात काम करायला हवं असंही ते म्हणाले. सुखबीरसिंह जौनपुरिया हे राजस्थानमधील टोंक इथले भाजप खासदार आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या त्यांच्या या अजब दाव्याची सध्या सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा रंगली आहे. त्यांचा चिखलात अंघोळ करताना आणि शंख वाजवतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.