IndiaNewsUpdate : स्वातंत्र्य दिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खलिस्तानचा ध्वज लावण्याचा इशारा, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खालिस्तानची मागणी करणाऱ्या दहशतवादी संघटना ‘शीख फॉर जस्टिस’ने स्वातंत्र दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकावणाऱ्यासाठी बक्षीसाची घोषणा केली आहे. या बक्षीसाची रक्कम 1.25 लाख अमेरिकी डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. “शीख फॉर जस्टिस”च्या या इशाऱ्यानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. इंटेलिजन्स ब्युरो आयबीला याबाबत माहिती मिळाली आहे की, खालिस्तान आंदोलनाला पुन्हा सक्रिय करण्यासाठी काही लोक काम करत आहेत.
दरम्यान खलिस्तान आंदोलनाला अधिक सक्रिय करण्यासाठी 14, 15 आणि 16 ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर केली जात आहे. आणि जो असं करेल त्याला बक्षीस देण्याची ही घोषणा या पोस्टमध्ये करण्यात आली आहे. अमेरिकेत राहत असलेल्या अॅडवोकेट गुरुपतवंत सिंह पन्नू जो SFJ फोरमचा लीगल ॲडव्हायझर सुद्धा आहे. त्याने युट्यूबवर “शीख फॉर जस्टीस” या नावाने व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खालिस्तानचा झेंडा फडकवण्याचं आवाहन केले आहे. तसेच जो व्यक्ती झेंडा फडकवेल त्याला 1.25 लाख अमेरिकी डॉलर रक्कम बक्षीस स्वरूपात देण्याचं ही म्हटलं आहे.