CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासांत राज्यात २६४ पोलिसांना कोरोनाची लागण , तिघांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून तीन पोलिसांनी करोना संसर्गाच्या साथीत आपला जीव गमावला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पोलस दलातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ११ हजार ३९२ झाली असून यापैकी ९ हजार १८९ जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत. सध्या २ हजार ८४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे दगावलेल्या पोलिसांची संख्या १२१वर पोहोचली आहे. तर, २ हजार ८४ पोलिस उपचार घेत आहेत. पोलिस दलात संसर्ग झालेल्या पोलिसांमध्ये १ हजार १७९ अधिकारी व १० हजार २१३ कर्मचारी यांचा समावेश आहे. तर आत्तापर्यंत करोनामुळं मृत्यू झालेल्या १२१ पोलिसांमधील ११ अधिकारी व ११० कर्मचारी आहेत. महाराष्ट्रात करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे.
दरम्यान पोलिस करोनाबाधित पोलिसांमुळे त्यांचे कुटुंबीयसुद्धा संसर्गित होत आहेत. त्यामुळे पोलिस कुटुंबीयांचेही विलगीकरण करावे लागत आहे. परिणामी अनेक पोलिस कुटुंबांसोबत संपर्क येऊ नये म्हणून काही दिवस पोलिस ठाण्यांत तर काही दिवस घरी राहात आहेत. कोरोनापासून बचावासाठी सर्व काही काळजी घेत असतानाही काही नागरिक नियम पाळत नसल्याने पोलिसांवरील ताण अधिक वाढत आहे.