सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सीबीआयकडून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल , कारवाईस प्रारंभ

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अखेर केंद्रीय अन्वेषण विभागानने गुन्हा दाखल केला आहे. बिहार सरकारच्या विनंतीवरुन सीबीआयने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकर सीबीआयच्या मुंबई विभागाला हे प्रकरण वर्ग करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली सीबीआयने एकूण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती, तिचे वडील-आई, भाऊ शोविक चक्रवर्ती, मित्र सॅन्मुयल मिरांडा, श्रुती मोदीसह एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी कट रचणे, आत्महत्येस जबाबदार असणे, अडवणूक करणे, चोरी, विश्वासघात करणे, फसवणूक करणे, कट रचणे या अंतर्गत , कलम 120 B,306,341,342,380,406,420,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहारमधील पाटणाच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा आता CBIकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांना ही सणसणीत चपराक असून त्यांच्या हातातून सुशांत सिंह राजपूत प्रकरण जवळपास गेल्याचे निश्चित झालं आहे. तर शनिवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी असून मुंबई पोलिस सुशांत सिंह प्रकरणाचा तपास अहवाल कोर्टात सादर करणार आहेत. मात्र, आता मुंबई पोलिस या प्रकरणी काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.