IndiaNewsUpdate : चिंताजनक : सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानी

केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही देशात सर्वत्र कोरोनाचा कहर चालूच असून गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून . देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे तर ३५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, फक्त जुलै महिन्यात भारतामध्ये ११.१ लाख करोनाबाधित रुग्ण आढळले असून १९ हजार १२२ जणांना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
जुलै महिन्यात प्रत्येक दिवसाला ६०० पेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच भारतामध्ये जुलै महिन्यात सरासरी प्रत्येक तासाला २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच भारत जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी पाचव्या स्थानी असलेल्या इटलीलाही भारतानं मागे सोडलं आहे. इटलीत करोनामुळे आतापर्यंत ३५ हजार १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत पहिल्या स्थानावर अमेरिका (१ लाख ५२ हजार ७०), ब्राझील (९१ हजार २६३), ब्रिटन (४६ हजार ८४) आणि मेक्सिको (४६ हजार) आणि पाचव्या स्थानी भारत आहे.
दरम्यान देशात करोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ४९ टक्के मृत्यू २० शहरांमध्ये झाले आहेत. या शहरात करोना संक्रमणाच्या सरासरीतही वाढ झालेली आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत देशात ५ लाख ६६ हजार ८४० इतकी करोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली.