CoronaEffect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला ” स्वॅब “, लॅब टेक्निशिअन गाजाआड…

राज्यात सर्वत्र कोरोनाच्या नावाने लोक भयभीत असताना कोरोनाच्या नावाखाली कोण काय करेल याचा नेम नाही , अशीच एक धक्कादायक घटना अमरावती जिल्यातील बडनेरा येथे घडली आहे. या घटनेमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्याची आगळीक लॅब तंत्रज्ञाने केली. संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपी लॅब टेक्निशिअन असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अमरावतीतील बडनेरा येथील कोविड टेस्ट लॅबमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आपल्या सहकाऱ्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पीडित तरुणीची करोना चाचणी करायची होती. त्यासाठी ती कोविड टेस्ट लॅबमध्ये गेली. त्यावेळी तेथील टेक्निशिअन तरुणाने तिच्या गुप्तांगातील स्वॅब घेतला. मात्र, करोना चाचणीसाठी गुप्तांगातून स्वॅब घेत नसल्याचं तरुणीला डॉक्टरांमार्फत समजले. त्यानंतर तिनं पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली. यावरून त्याच्याविरोधात बलात्कार आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पेश देशमुख असं या ३० वर्षीय आरोपीचं नाव आहे तो अमरावतीतील पुसदा येथील रहिवासी आहे.
या बाबत म. टा.ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार पीडित तरुणी ही एका मॉलमध्ये नोकरी करते. ती आपल्या भावाकडे राहते. ती ज्या मॉलमध्ये नोकरी करते, तेथील एका कर्मचाऱ्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले. २८ जुलै रोजी या तरुणीचे स्वॅब घेण्यात आले. मात्र, त्यानंतर अल्पेश याने या तरुणीला पुन्हा लॅबमध्ये बोलावले. तुमचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे असं तिला सांगितलं. तसेच तुम्हाला युरिनल चाचणी करावी लागेल, अशी बतावणी त्यानं केली. तरुणीनं ही बाब आपल्या एका वरिष्ठ महिला सहकाऱ्याच्या कानावर घातली. मात्र, लॅबमध्ये नमुने घेण्यासाठी महिला कर्मचारी नाही का अशी विचारणा तिनं त्या टेक्निशिअनकडे केली. त्यावर तुम्ही तपासणीसाठी एखाद्या महिलेला सोबत घेऊन येऊ शकता, असे सांगितले.
शेवटी सदर तरुणी लॅबमध्ये गेली असता, तिथे आरोपीने तिच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणीसाठी घेतले. त्यानंतर त्यानं तुमचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळवले . मात्र, करोना चाचणीसाठी गुप्तांगातून स्वॅब घेतल्यावर तिला शंका आली. तिनं आपल्या भावाला याबाबत सांगितलं. त्यानं एका डॉक्टरला याबाबत विचारणा केली. अशा प्रकारे चाचणीसाठी स्वॅब घेतले जात नसल्यानं त्याला डॉक्टरांनी सांगितलं. तिनं या प्रकरणी लॅब टेक्निशिअनविरोधात बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.