LaturCrimeUpdate : रुग्ण दगावल्याच्या रागातून डॉक्टरवर चाकू हल्ला , डॉक्टरची प्रकृती स्थिर , सर्वत्र निषेध

राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर चालू असताना लातूर येथील अल्फा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत असून, या रुग्णालयात आज सकाळी एका रुग्णाच्या नातेवाइकानं डॉक्टरांवर चाकू हल्ला केला परंतु या हल्ल्यातून डॉक्टर बचावले. त्यांच्यावर उपचार केले जात असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉ. दिनेश वर्मा असं डॉक्टरांचं नाव आहे.गेल्या चार दिवसांपासून एक रुग्ण या रुग्णालयात दाखल होता. ते वयोवृद्ध होते. त्यात त्यांना मधुमेहाचा त्रास होता. रुग्णाची प्रकृती गंभीर होती हे नातेवाइकांना माहीत होते. मात्र, रुग्ण दगावल्यानंतर त्याच्या एका नातेवाइकानं डॉ. वर्मा यांच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेमुळं तीव्र संताप व्यक्त होत असून, लातूरमधील संघटनेनं या घटनेचा निषेध केला आहे. सध्याच्या कठीण प्रसंगातही डॉक्टर हे रुग्णांना सेवा देत आहेत. अशावेळी ही घटना घडणे निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया लातूर जिल्हा आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केली. हल्ल्याची घटना निषेधार्ह असून, आरोपीवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच अमित देशमुख यांनीही यामध्ये लक्ष घालावे, असे संघटनेने सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा प्रवृत्ती रोखण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहितीही संघटनेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.